All Posts
thumbnail

कोंकण दर्शन भाग १ (दिवस पहिला)


Read More
तर प्लॅन ठरला. कोंकण दर्शनचा. किल्ले घेरापालगड ते बाणकोट व्हाया मंडणगड ते गुहागर पर्यंतचा सागर किनारी पट्टा. हातात तीन दिवस आणि ८ सवंगडी. शनिवार, ३० जानेवारी २०२१ रोजी दुपारी ४ वाजता निघायचे. रात्री ८ पर्यंत घेरा पालगड ला मुक्कामी पोहोचायचे. 

सगळं ठरलं. तयारी झाली. आणि निघालो. निघायला मात्र दुपारी ४ च्या ऐवजी संध्याकाळचे ६ वाजले. निघताना मात्र ६ जन. मी (अझरूद्दीन पटेल), अमोल तोडकर, पंकज कांबळे, सागर काशीद, रवी सादिगले आणि अजिंक्य सावंत.


कराड - पाटण - कोयनानगर - चिपळूण असे मजल दरमजल करत रात्री ९.३० च्या दरम्यान खेड येथे पोहोचलो. तिथे सगळ्यांशी चर्चा करून घेरा पालगडच्या ६ कि.मी. अलीकडे असणारे श्री झोलाई देवी मंदिर गाठण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अर्ध्या तासात श्री झोलाई देवी मंदिरात पोहोचलो.

श्री झोलाईदेवी मंदीर, पालगड

काही काळापूर्वीच या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. मंदिराचे आवार एकदम प्रशस्त आहे. शेजारी सभामंडप, पिण्याच्या पाण्याची, बाथरूम - टॉयलेटची सोय. पण मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार कुलूपबंद असल्यामुळे आता जाऊन आतील भाग बघता आणि देवीचे दर्शन घेता आले नाही. 
याच सभामंडपात आम्ही रात्र काढली.

रात्रीचे 10:30 झाले होते. अजून जेवण झाले नव्हते. आम्ही सगळे हात, पाय, तोंड धुवून फ्रेश झालो. अजुन आमचे जेवण झाले नव्हते. सगळे मंदिर प्रांगणात जेवायला बसलो. घरून आणलेल्या शिदोऱ्या सोडल्या. वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत, गप्पा मारत जेवण चालू झाले.

काही वेळाने एक बोलेरो गाडी मंदिराच्या गेट पुढे येऊन उभी राहिली. गाडीत श्री. कदम साहेब होते. हे या मंदिर अध्यक्ष होते. त्यांच्याशी थोडे बोललो. त्यांनी मंदिर परिसरात झोपायची परवानगी दिली. तसेच मंदिर उघडुन आत झोपण्यास जागा देण्याबद्दल असमर्थता व्यक्त करून दिलगिरीही व्यक्त केली. ते गेल्यावर आम्ही आमचे जेवण उरकून घेतले आणि झोपायच्या तयारीला लागलो.

सभामंडपात जागा साफ करून आमच्या वळकट्या टाकल्या आणि निद्रेच्या स्वाधीन झालो.


दिवस पहिला

रविवार, दि. ३१ जानेवारी २०२१

या कोंकण दर्शन ट्रीप मधील भटकंती चा आजचा हा पहिला दिवस होता. आज किल्ले पालगड - साने गुरुजी स्मृती भवन, पालगड - श्री. केशरराज मंदिर, शेडवई - किल्ले मंडणगड - किल्ले हिंमतगड, बाणकोट - वेळास असा मोठा पल्ला गाठायचा होता. 

सकाळी ६ वाजता उठून प्रातर्विधी आटोपून किल्ले पालगड ला ८ वाजता पोहोचलो.  

किल्ले पालगड :
गडाच्या माचीवर किल्ले माची ही छोटेखानी वस्ती आहे. येथील लोक ही आपुलकीने आणि प्रेमाने आपला पाहुणचार करातात. स्थानिक नागरिकांना भेटून गाड्या पार्क केल्या. त्यांच्या कडून थोडी माहिती घेऊन किल्ल्यावर निघालो.
किल्ले घेरा पालगड 

गावापासून ते गडाच्या उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वारापर्यंत (थोडे अलीकडे) प्रशस्त असा कच्चा रस्ता आहे. त्यामुळे किल्ला चढण्यास फार त्रास होत नाही. 


अवघ्या २० मिनिटात आपण किल्याच्या भग्न प्रवेशद्वाराशी येऊन पोहोचतो. 


येथे अंदाजे १०० पायऱ्या लागतात. त्या चढून गेले की दोन छोटे पण भग्न बरुज असलेल्या दरवाज्याजवळ येतो. येथील दरवाजा सुद्धा पडलेला आहे. 

गडावर वाड्यांची काही जोती, दोन तोफा, पाण्याची तळी, तटबंदी, बुरुज आणि पूर्वेकडील दरवाजा असे काही भग्न अवशेष आहेत. अगदी आटोपशीर आकार असल्याने किल्ला फिरण्यास फार वेळ लागत नाही. 

किल्ल्या वर एका चौथऱ्यावर स्थानिक तरुणांनी छ. शिवाजी महाराजांची एक मूर्ती बसवलेली आहे. त्याचे आम्ही दर्शन घेतले. 


गडाच्या पूर्वेकडील दरवाज्याने खाली उतरण्याचा आम्ही निर्णय घेतला. 





या दरवाज्याने खाली गावाकडे उतराता येते. मात्र थोडी कसरत करावी लागते. 



थोडे खाली आल्यावर उजवीकडे गडाच्या काताळाला लागून एक रस्ता थोडा खाली जातो. या रस्त्याने १०० मीटर अंतर चालत गेल्यावर काही अर्धवट खोदलेल्या गुहा दिसतात. त्यात आता पाणी साठलेले आहे. 


गडावर इतरत्र कुठेही पाण्याची सोय नाही. ही लेणी पाहून गावात परत यायला साधारण अर्धा तास पुरतो. आणि आपली एक गडफेरी पूर्ण होते. 

आजूबाजूच्या प्रदेशावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच रसद पुरवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. हा किल्ला कोणी बांधला याच्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. मात्र शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात होता. 

साने गुरुजी स्मृती भवन :
किल्ले पालगड पाहिल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा पालगड गावाकडे वळवला. येथे आम्हाला साने गुरुजी स्मृती भवन ला भेट द्यायची होती.

पालगड हे 'श्यामची आई' या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांचे जन्मस्थान. त्यांच्या घराचे नूतनकरण करून तेथे माहिती व फोटोच्यां माध्यमातून त्यांचा जीवनपट उलगडणारे स्मारक उभारण्यात आले आहे. येथे भेट देऊन आम्ही साने गुरुजींचा जीवनपट माहिती करून घेतला. आणि पुढील प्रवासास निघालो. 


पुढचा टप्पा होता केशारराज मंदीर, शेडवई.


श्री. केशरनाथ मंदिर, शेडवई


मंडणगड - दापोली रोडवर मंडणगड पासून १२ कि.मी. अंतरावर दहागाव येथे एक फाटा आहे. तिथून आत ७ कि. मी. अंतरावर शेडवई हे गाव आहे. या गावाच्या थोडे अलीकडे एका ओढ्याच्या काठी एक मंदिर आहे.


बाहेरून साधेसुधे असलेले हे मंदिर त्यातील विष्णूच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.


काळया पाषाणातील ही मूर्ती ८०० वर्षे जुनी असून १२ व्या शतकातील आहे. या मूर्तीच्या हातात पद्म, शंख, गदा, चक्र आहेत. तसेच प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. उत्कृष्ठ कोरीवकाम केलेली ही मूर्ती अप्रतिम आहे. थोडी वाकडी वाट करून जरूर पहावी अशीच ही मूर्ती आहे. 


या मंदिराशेजारीच महादेवाचेही मंदीर आहे. 


ही मूर्ती पाहण्यासाठी आम्ही ही आमची वाट वाकडी केली. मुख्य रस्त्यापासून अर्ध्या तासात या मंदिराजवळ येऊन पोहोचलो. उन्हामुळे आणि सकाळ पासून सुरू असलेल्या प्रवासामुळे थोडा क्षीण आला होता. पण मंदिरा शेजारून खळखळत वाहत असलेला हा ओढा आणि मंदिराचा निसर्गरम्य परिसर पाहून सगळा क्षीण निघून गेला. मंदिरात जाऊन आम्ही मूर्तीचे दर्शन घेतले. थोडा वेळ मूर्ती निहाळली. त्यातील कलाकुसर, सुबकता पाहून मन प्रसन्न झाले. त्यानतंर ओढ्याकाठी हात, पाय, तोंड धुवून जेवायला बसलो. 


या निसर्ग रम्य प्रदेशात वनभोजनाचा आनंद घेत मनसोक्त जोवलो. गप्पा मारल्या आणि पुढील प्रवासास निघालो. 

पुढचा टप्पा होता, किल्ले मंडणगड.


मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. शहराच्या पश्चिमेस एक डोंगर असून हाच किल्ले मंडणगड होय. काही वर्षांपूर्वी गडावर जाण्यासाठी गाडी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गाड्या अगदी वरपर्यंत, गडाच्या दरवाजा पर्यंत जातात. 

दुर्दैवाने गडाचा दरवाजा मात्र अस्तित्वात नाही. मात्र बुरुजाचे अवशेष आढळून येतात. येथे आता लोखंडी गेट केले आहे. गडावर दोन शिखरे आहेत. मात्र उजवीकडील शिखरावर एक पाण्याचे तळे असून दाट झाडी व्यतिरिक्त दुसरे काही नाही. 


डावीकडील भाग थोडा सपाट असून येथे काही अवशेष आहेत. या भागात इमारतींचे जोते दिसतात. तसेच एक कबर ही आहे. छ. शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दौलतखान यांची ही कबर असावी असा अंदाज आहे. 


गडावर गणेशाचे एक जिर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या बाजूला एक मोठे पाण्याचे तळे असून त्यात बारमाही पाणी असते. तसेच गडावर आणखी एक तळे पण कोरडे पडलेले दिसून येते. याशिवाय गडावर ८ फूट लांबीची तोफ आहे. गडाच्या तटबंदीची पडझड झालेली आहे. काही ठिकाणी तटबंदी दिसून येते.
 

हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला असावा असा अंदाज आहे. पण त्याला सबळ पुरावा मिळत नाही. काहींच्या मते किल्ल्यावरील बांधणीच्या शैलीवरून हा किल्ला आदिलशाहीतील असावा.

किल्ले मंडणगडवरील अवशेष 

दाभोळ मोहिमेवेळी शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार दळवींच्या कडून हा किल्ला घेतला. त्यानतंर हा किल्ला मराठे, सिद्धी, आंग्रे यांच्या ताब्यात होता. १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. 

आम्ही पूर्वीही मंडणगड ला भेट दिली असल्याने यावेळची ही धावती भेट होती. गडाच्या गेट जवळ गाड्या लावून आम्ही किल्ल्यावर प्रवेशकर्ते झालो. कबर, पाण्याचे तळे, गणेश मंदिर, तोफ आणि पश्चिमेकडील भाग डोळ्याखाली घातला. किल्ल्यावरून विहंगम दृष्य दृष्टीस पडते. त्याचा मनमुराद आनंद घेतला आणि पाय उतार होत पुढील मार्गक्रम सुरू केला.


एव्हाना ४ वाजले होते. आम्हाला आता बाणकोट येथील हिम्मतगड गाठायचा होता. 

पस्तीसेक किमी अंतर पार करायचे होते. खराब रस्त्यामुळे पाऊन तासांचे हे अंतर पार करण्यासाठी एक तास लागला आणि आम्ही बाणकोट येथील हिमतगड / व्हिक्टोरिया फोर्ट येथे येऊन पोहोचलो.

बाणकोट येथील हिम्मतगड / व्हिक्टोरिया फोर्ट : 

येथे जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. त्यामुळे आता थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. दोन्ही बाजूला दोन भक्कम बुरुज आणि मध्ये प्रवेशद्वार अशी याची रचना आहे. 


प्रवेशद्वारातून आत गेले डाव्या-उजव्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. 


तेथून पुढे गेले की किल्ल्याचा सगळा परिसर दिसतो. 



आत जुन्या इमारतीची फक्त जोते शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे दरवाजा व तटबंदी वर जाण्यासाठी जिना आहे. जिना चढून वर गेले की दोन्ही प्रशस्त बुरुज, त्यावर एक तोफ दिसून येते. 



सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने एका भक्कम गाड्यावर ही तोफ बसवण्यात आली आहे. 





किल्ल्याच्या पश्चिम बाजूस आणखी एक दरवाजा आहे. येथेही दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. 




या दरवाजातून पश्चिम बाजूस उतरत जाणाऱ्या तटबंदी युक्त भागाकडे जाता येते. अर्धवर्तुळाकार असणारा हा भाग दुहेरी तटबंदी व बुरुजासारखा आहे. येथे तटबंदी मध्ये एक खोली तयार करण्यात आली आहे. 



तसेच तटबंदी पलीकडे उतरण्यासाठी दिंडी दरवाजा सुद्धा आहे. पूर्वी या संपूर्ण किल्ल्याच्या सभोवती खंदक होता. पण आता तो पूर्णपणे मुजलेला आहे. 




हिम्मतगडचा परिसर पाहून आम्ही पश्चिमेच्या बाजूस खाली उतरलो. येथे एका चौथऱ्यावर एक दगडी - कलापूर्ण स्तंभ उभारलेला आहे. हे एक स्मारक आहे. 




बाणकोट नदीत जलसमाधी मिळालेल्या एका स्त्रीचे आणि एका लहान बाळाचे. २५ वर्षाची सोफिया मॅलेट आणि फक्त ३२ दिवसांची एलेन व्हॅरिएट यांचे! "मॅलेट मेमोरियल" म्हणून हे स्थळ ओळखले जाते. 

ऑर्थर मॅलेट हा ब्रिटिश अधिकारी मुंबई येथून समुद्रमार्गे नावेतून महाबळेश्वरला निघालेला होता. वादळामुळे त्यांची नाव बाणकोट खाडीत बुडाली. सोफिया मॅलेट, एलेन व्हॅरिएट यांच्यासह १३ खलाशी पाण्यात बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे हे स्मारक. 

महाबळेश्वर मध्ये सावित्री नदीच्या उगमापाशी हा ऑर्थर मॅलेट एकांतात जाऊन बसत असे. तोच आजचा ऑर्थर सीट पॉइंट होय. 

हे स्मारक पाहून आणि मृतांना मनोमन श्रद्धांजली वाहून आम्ही पुढे निघालो. आमचा पुढचा टप्पा आणि मुक्कामाचे ठिकाण होते वेळास. 

वेळास :

वेळास हे इतिहासात प्रसिद्ध असणाऱ्या नाना फडणवीस यांचे गाव. गावात नाना फडणवीस यांचा पुतळा, कालभैरव, महादेव इ. मंदिरे आहेत.


गावातील मुख्य वस्तीत एका उंच चौथऱ्यावर कालभैरव आणि महादेवाचे मंदिर आहे.






कालभैरव मंदिर दक्षिणाभिमुख आणि महादेव मंदिर पूर्वाभिमुख आहे. 



दगडी बांधकाम असणारी ही पेशवेकालीन मंदिरे सुरेख आहेत. येथून जवळच नाना फडणवीस यांच्या घराचे आवार आहे. तेथील घर आता पूर्ण पडलेले आहे. येथे एका चौथऱ्यावर एका छोट्या घुमटी मध्ये नाना फडणवीस यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे.


आम्ही हा सगळा परिसर पहिला. थोडा विसावा घेतला. 


या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे उन्हाळ्यात समुद्र किनारी सागरी कासवांची विण होते. शेकडो छोटी छोटी कासवे वाळू वरून समुद्राच्या दिशेने प्रवास करतात. 

आम्ही हा सिजन सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी पोहोचलो असल्याने हा सुंदर नजारा पाहायला मिळाला नाही. पुन्हा कधीतरी ते पाहू असा निश्चय केला आणि मुक्कामाचे नियोजन करू लागलो. 

वेळास मध्ये मुक्कामी राहणार होतो. दुसऱ्या दिवशी केळशी हे आमचे पहिले ठिकाण होते. अजून अंधार पडला नव्हता. आमच्यात थोडी खलबते होऊन केळशी गाठावे असे सर्वानुमते ठरले. त्यामुळे आम्ही केळशी कडे मार्गस्थ झालो. 

वेळास कडून येताना भारज्या नदीची खाडी ओलांडून केळशीत यावे लागते. आमचे मार्गक्रमण होत असताना सूर्यास्ताची वेळ होत होती. म्हणून सूर्यास्त पाहून पुढे जाऊ असा विचार करून आम्ही खाडीच्या किनाऱ्यावर थांबलो. मावळतीला जाणाऱ्या सूर्य नारायणाचे दर्शन घेत निसर्गाच्या विविध छटांचा मनमुराद आनंद लुटला. 

आता पुन्हा खाडीच्या कडेने केळशी कडे आमचा प्रवास सुरु झाला. गूगल मॅप सुरु होता त्याच्या आधारे आमचा प्रवास चालू होता. वाटेत वारकरणीचा धबधबा, डूऱ्याचा धबधबा, देवळाचा धबधबा, चिखलीचा धबधबा, गोठणीचा धबधबा, खेत्रीपाल धबधबा अशी नावे दिसत होती. पण अंधार दाटल्याने हे धबधबे पाहण्याची सोय माञ नव्हती. 

मजल दर मजल करत आम्ही एकदाचे केळशी मध्ये येऊन पोहोचलो. आता दोन गोष्टी करणे भाग होते. एक जेवणाची सोय आणि दुसरी झोपण्याची सोय. फिरतीवर असताना लॉज मध्ये राहायचे नाही, हा आमचा अलिखित नियम आहे. त्यामुळे एखादे मंदीर बघावे आणि झोपून जावे. हा आमचा शिरस्ता. इथे एक अडचण आमच्यापुढे उभी राहिली. ती म्हणजे रात्री येथील मंदिरे बंद असतात शिवाय मंदिरांमध्ये राहण्याची परवानगी दिली जात नाही. आता आमची पंचायत झाली. मग लॉज हाच एक पर्याय होता. पण येथील दर न परवडणारे होते. आमच्या पूर्ण ट्रिपचे बजेट हलवणारे होते. त्यामुळे लॉज मध्ये राहण्यास मन धजावत नव्हते. वेळ बराच होत होता. जेवणाची सोय बघायची होती. केळशीतील महालक्ष्मी मंदिर, बाबा याकुत दर्गा किंवा बेलेश्र्वर मंदिर, उटंबर असे पर्याय आता शिल्लक होते. जेवणाची सोय बघावी म्हणून आम्ही सद्गुरू कृपा मिसळ हाऊस मध्ये गेलो. येथे आम्हाला कमी कीमतीत चविष्ठ शाकाहारी जेवण मिळाले. येथील मालकांनी उटंबर येथील मंदिरात जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे आम्ही उटंबर येथील मंदिरात येऊन आमची अंथरूण पांघरूण काढले आणि निद्रेच्या स्वाधीन झालो.